Success Story

स्वच्छ भारत अभियान

स्वच्छ सुंदर अमरावतीसाठी तरुणांचा स्तुत्य उपक्रम

ICA1
ICA2
ICA3
ICA4
Swipe

उपक्रम

  • शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे आवाहन
  • स्थानिक अधिकारी, राजकीय व्यक्ती आणि समाजातील कर्तव्यदक्ष नागरिकांचा पाठींबा 
  • सदस्य संख्या ८ वरून ८३ वर

‘येथे कचरा टाकु नये' असे लिहिलेल्या भिंतीजवळच कचऱ्याचे ढीग किंवा' येथे थुंकू नये' असे लिहिलेल्या भिंतीवरच पानाच्या पिचकाऱ्या. ही परिस्थिती सर्रास पाहायला मिळते. आणि याला कारण म्हणजे लोकांची मानसिकता. जिथे स्वच्छ आणि सुंदर भिंत दिसली तिथे काही दिवसातच पानाच्या किंवा गुटख्याच्या पिचकारिचा एक तरी डाग दिसणारच. आणि काही दिवसांनी संपूर्ण भिंत त्या पिचकाऱ्यांनी अशी काही रंगून जाते की त्यावर लिहिलेली सूचनाच दिसेनाशी होते. हे रोखण्यासाठी जनजागृती करायची असेल तर ती जनमानसामधूनच व्हायला हवी. आणि याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे काही युवकांनी एकत्र येत सुरु केलेला 'आय क्लीन अमरावती' उपक्रम.

आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठी अमरावती येथील अभियांत्रिकी चे शिक्षण घेत असलेला 'आदित्य माथनकर ' आणि त्याचे सात साथीदार यांनी मिळून 'आय क्लीन अमरावती' असा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांच्या मनात जनजागृती करणे आणि शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे आवाहन करणे हा आहे. या उपक्रआंतर्गत विद्यार्थी आणि शहरातील सुजाण नागरिक रविवारी एकत्र येतात आणि शहरातील एक अस्वच्छ भिंत साफ करून त्यावर सुरेख असे वारली चित्र काढून पूर्ण भिंत अतिशय सुंदर रंगवून एकदम देखणी बनवतात. यामुळे 'सुजाण नागरिक' ती भिंत पुन्हा अस्वच्छ करण्यास धजावणार नाहीत असा विश्वास त्यांना असतो. या अतिशय स्तुत्य अशा उपक्रमात त्यांना स्थानिक अधिकारी, राजकीय व्यक्ती आणि समाजातील कर्तव्यदक्ष नागरिकांनी पाठींबा दिलाय. सुरुवातीस ७ - ८ जणांनी एकत्र येऊन सुरु केलेल्या या उपक्रमाच्या कुटुंबाची संख्या आज 83 सदस्यांच्या घरात पोचली आहे.

या उपक्रमामुळे अमरावती शहरातील तरुण आणि कर्तव्यदक्ष नागरिक स्वच्छता मोहिमेकडे आकृष्ट झाले आहेत. सर्व शहरांतील तरुणांनी या स्तुत्य उपक्रमाची दखल घेऊन प्रत्येक शहरात 'आय क्लीन' सारखा उपक्रम राबविणे काळाची गरज आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरलेली स्वच्छ भारताची कास, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांना घातेलेली साद व त्यास मिळणारा प्रतिसाद पाहता महाराष्ट्रातील सर्व शहरे लवकरच स्वच्छ आणि सुंदर बनणार आहेत यात शंकाच नाही.

शब्दांकन: श्रुती कुलकर्णी, मुख्यमंत्री फेलो